लोह्यातील महाविद्यालयीन तरूणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला टिप्पर अखेर पोलिसांनी केला जप्त; चालकावर गुन्हा मात्र मालक नामानिराळा

817

प्रदीप कांबळे,

लोहा, नांदेड –

तालुक्यातून वाहणाऱ्या गोदा पात्रातील गौण खनिज रेती माफियांकडून अनधिकृतरीत्या उपसा करून भरधाव वेगात टिप्परद्वारे वाहतूक केली जात आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे आजपर्यंत अनेकवेळा अपघात घडले असून यात काहीना जीव गमवावा लागला तर काहीना कायमचे अपंगत्व आले. एवढे होत असताना आणि संबंधित विभागाकडे यासंदर्भात असंख्य तक्रारी प्राप्त होऊन देखील केवळ आर्थिक मोहापायी महसूल प्रशासन यावर कुठलीही कार्यवाही न करता केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.

सात दिवसांपूर्वी महाविद्यालयीन तरुणास गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झालेला फरार टिप्पर जनरेट्यामुळे पोलिसांनी सात दिवसानंतर जप्त करत चालका विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला खरा मात्र मुख्य रेती माफिया (वाहन मालक) नामानिराळाच असल्याचे सदरील कार्यवाही वरून समोर आले आहे.

हेही वाचा: 

अर्धापूर-नांदेड रोडवर खंजीरचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणा-या २ जणांना पोलीसांनी केली अटक

तालुक्यातील पेनूर, अंतेश्वर, भारसवाडा, चित्रावाडी, शेवडी (बा), कपिलेश्वर सांगवी, बेटसांगवी, येळी कौडगाव आदीसह इतर ठिकाणाहून अनधिकृतरीत्या दिवसरात्र बेसुमार वाळू उपसा व टिप्परद्वारे ओव्हरलोड वाहतूक करण्यात येत आहे.यासंदर्भात महसूल विभागाकडे असंख्य तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्यानंतर चुटपुट कार्यवाहीचा देखावा करत “आम्ही कार्यवाही करत आहोत, संपूर्णपणे अवैध वाळू उपसा व वाहतूक बंद” असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे. सदरील वाळूने भरलेले टिप्पर हे पोलिसांना व महसूल विभागाला चकवा देण्याच्या नादात भरधाव वेगाने धावत आहेत. परिणामी रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दि.२९ एप्रिल रोजी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडला व कंधार रस्त्यालगत फिरत असताना त्यास भरधाव वेगातील टिप्परने बसवराज शिवराज सोनवळे या पंचवीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणास जबर धडक देवून गंभीर जखमी केले. जखमी बसवराजवर नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना चौथ्या दिवशी उपचारादरम्यान बसवराजचा मृत्यू झाला. मृत्यूच्या घटनेची माहिती मिळताच बसवराजचे नातेवाईक व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बसवराजचे प्रेत थेट तहसील कार्यालयात नेत तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना घेराव घालत धारेवर धरले. अपघात घडविणाऱ्या टिप्परवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अनधिकृत रेती उपसा व वाहतूक बंद करावी अशी मागणी लावून धरली.

तहसीलदारांनी दिलेल्या आश्वसनामुळे नातेवाईकांनी तूर्त माघार घेतली. कालांतराने सदरील अपघातग्रस्त वाहन हे वाळूचे टिप्पर नसल्याचा निर्वाळा तहसीलदारांनी दिला. मात्र घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी नंबर खोडलेला टिप्परच असल्याचे ठणकावून सांगितल्याने पोलिसांनी शोधकार्य हाती घेत दि.६ मे रोजी शुक्रवारी पहाटे सदरील अपघात घडविणाऱ्या टिप्पर क्र. एम एच ४८ ए जी ८४२७ यास ताब्यात घेवून चालकाविरुद्ध लोहा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असला तरी मालकास अभय का दिले..? त्याचा पाठीराखा कोण..? वाळूचा टिप्पर नाही म्हणणाऱ्या महसुलच्या अधिकाऱ्यावर वरिष्ठ प्रशासकीय कार्यवाही करतील का..? आर्थिक मोहापायी रेती माफियांना पाठीशी घालणाऱ्या महसुलच्या स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.