देशात समान नागरी कायदा लवकरच लागू होणार
भोपाळ, मध्यप्रदेश –
देशात समान नागरी कायदा लवकरच ( युनिफॉर्म सिव्हिल कोड) लागू होईल, अशी शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तसे स्पष्ट संकेत भोपाळ दौर्यात दिले आहेत.
राम मंदिर, कलम 370 आणि तीन तलाकसारख्या विषयांवर निर्णय झाले आहेत, आता समान नागरी कायद्याचा विषय आहे. तोही मार्गी लावला जाईल.तशी वेळही आली आहे,असे भाजप कार्यालयात कोअर कमिटीच्या बैठकीत शहा यांनी सांगितले.
उत्तराखंड राज्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून समान नागरी कायदा लागू केला जात आहे. मसुदा तयार झालेला आहे. राहिलेले कामही पूर्ण केले जाईल.राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना उद्देशून, देशात सर्व ठिक चाललेले आहे ना? अशी विचारणा शहा यांनी केली आणि समान नागरी कायद्याबाबत चर्चा केली.निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधी यांना दिले जाईल पण यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. काँग्रेस आणखी खाली येणार आहे, अशी टीका शहा यांनी केली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष व्ही.डी.शर्मा, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते.
काय आहे समान नागरी कायदा ?
हा कायदा लागू होताच विवाह, फारकत,वारसा, दत्तकविधानासारख्या बाबी एका समान कायद्यांतर्गत येतील. यात धर्म, पंथाच्या आधारावर अन्य न्यायालय वा इतर व्यवस्था नसेल. राज्यघटनेच्या कलम 44 अंतर्गत कायदा लागू होईल. हा कायदा केंद्र सरकार संसदेत निर्णय घेऊन लागू करू शकते.