काँग्रेस पक्ष ‘तृणमूल’ मद्धे विलीन करण्याची हीच वेळ, बंगालच्या मंत्र्याचा सल्ला !

273
                 
                  कोलकाता, पश्चिम बंगाल –

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर आता प्रादेशिक पक्षांनीही काँग्रेस पक्षावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. 4 राज्यातील भाजपच्या दणदणीत विजयानंतर तृणमूल काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याने चक्क काँग्रेसला टीएमसी मध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे टीएमसीच्या नेत्याकडून असे विधाने आल्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी चांगलेच संतापले आहेत. त्यांनी टीएमसी आणि भाजपमध्ये हातमिळवणी असल्याचा आरोप केला असून टीएमसी भाजपचा एजंट असल्याची टीका केली आहे.

तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री फिरहाद हाकिम यांनी सर्वात जुन्या असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेससारख्या जुन्या पक्षाला पाच राज्यांच्या निवडणुकीत दारुण पराभवाला कसे काय सामोरे जावे लागते, हे मला समजत नाही. एकेकाळी मी सुद्धा या पक्षाचा भाग होतो. सततच्या पराभवानंतर काँग्रेस आता स्वत:च्या पायावर उभी राहून भाजपशी स्पर्धा करू शकत नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसने तृणमूल काँग्रेसमध्ये सामील व्हावे, काँग्रेसचे टीएमसीमध्ये विलीनीकरण करण्याची हीच योग्य वेळ आहे. काँग्रेसचे ‘तृणमूल’ मध्ये विलीनीकरण झाल्यास राष्ट्रीय पातळीवर महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या तत्त्वांचे अनुकरण करून आपण गोडसेंच्या तत्त्वांविरुद्ध लढू शकतो असे ते म्हणाले.

काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी संतापले…

पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी टीएमसीच्या या प्रस्तावावर संतापले आहेत. टीएमसी हे भाजपचे सर्वात मोठे एजंट असल्याची टीका चौधरी यांनी केली आहे.उलट त्यांनी टीएमसीला सल्ला दिला आहे की, जर ते भाजपविरोधात लढण्यास गंभीर असतील तर त्यांनीच काँग्रेसमध्ये विलीन व्हावे.

Leave A Reply

Your email address will not be published.