व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून व तलवारीचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांना स्थागुशाने केली अटक

2,680

नांदेड-

शहराच्या धनेगाव शिवारातील कापुस संशोधन केंद्राच्या समोरून स्कुटीवर जाणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून व तलवारीचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करून आरोपीना अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिले होते. त्या आदेशानुसार स्थागुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी फरार 3 आरोपींना पथकाच्या साहाय्याने अटक केली आहे.

नांदेड शहरासह जिल्ह्यात अनेक तालुक्यात दुचाकी- स्वारांना शस्त्रांचा धाक दाखवून व डोळ्यात मिरची पूड टाकून लुटण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे, असाच प्रकार नांदेड ग्रामीण हद्दीत दि.15 रोजी घडला होता. येथील व्यापारी सय्यद अतिक सय्यद रशीद हे आठवडी बाजारात व्यवसाय करून जमलेली रक्कम घेऊन वाजेगाव येथील घराकडे स्कुटीवरून कापूस संशोधन केंद्राच्या समोरून जात असताना तिघांनी पाठीमागून दुचाकीवरून येऊन डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्यानंतर तलवारीचा धाक दाखवून 4 लाख 60 हजार नगदी रक्कम तसेच दुचाकीची अंदाजे किंमत 70,000 रुपये व्यापाऱ्याकडून हिसकावून फरार झाले होते.याबाबत दिलेल्या तक्रारीवरून लूटमार प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तात्काळ शोध लावून आरोपींना अटक करण्यात यावेत असे आदेश पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी स्थागुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून स्थागुशाच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंद मुंडे, जसवंतसिंह साहू, मारोती तेलंग, मोतीराम पवार, विठ्ठल शेळके, विलास कदम यांना रवाना करण्यात आले होते.

स्थागुशाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सोहेब खान शब्बीर खान, वय 21 वर्ष यास ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखविताच त्याने 5 जणांनी मिळून हा गुन्हा केल्याचे मान्य केले. नूरखान हुसेन पठाण, वय 35 वर्ष, सय्यद ताहेर सय्यद अब्दुल, वय 34 वर्ष हे गुन्ह्यात सोबत असल्याची कबुली दिली. यावरून पोलिसांनी या तिघांना अटक केली असून, या प्रकरणातील अन्य 2 साथीदार अद्यापही फरार आहेत.

या दरोडेखोराना पकडल्यानंतर शहरासह जिल्ह्यात घडलेल्या अन्य घटनेचा छडा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या कार्यवाही प्रकरणी पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांनी स्थागुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.