टिप्परची मोटारसायकलला धडक, पती-पत्नी बालंबाल बचावले; लोह्यातील घटना

819

लोहा, नांदेड –

नांदेड – लातूर राष्ट्रीय महामार्गावरील लोहा शहरातील वर्दळीचे प्रमुख ठिकाण असलेले छत्रपती शिवाजी चौक येथे मोठी गोलाई आहे. चौकाच्या चोहोबाजूंनी अवैध प्रवासी वाहतूक करणारे उभी असलेली वाहने, फळ विक्रेत्यांचे गाडे तसेच इतर व्यावसायिकांनी दुकानांचा पसारा रस्त्यापर्यंत आणल्यामुळे सातत्याने शिवाजी चौकात अपघाताच्या घटना घडत असतात. एक टिप्पर बसस्थानकाकडून शिवाजी चौक मार्गे गंगाखेड रस्त्याकडे जात असताना मोटारसायकलीस टिप्परची धडक लागून मोटारसायकल वरील पती-पत्नी बालंबाल बचावले सदरील घटना दि.22 रोजी रविवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास घडली.

मागील महिनाभरापूर्वी कंधार रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाला भरधाव वेगातील वाळूच्या टिप्परने जबर धडक देवून गंभीर जखमी केले होते आणि घटना घडताच सदर टिप्पर घटनास्थळावरून पसार झाला होता. काही सामाजिक संघटनेच्या रेट्यामुळे पोलिसांनी शोधकार्य हाती घेवून आठ दिवसात अपघातास कारणीभूत ठरलेला टिप्पर ताब्यात घेवून मालक सोडून चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र महसूल प्रशासन रेती माफियांना पाठीशी घालण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतानाचे दिसून आले.

एकीकडे लोहा तहसील हद्दी अंतर्गत कुठेच रेती उपसा व वाहतूक नाही म्हणणाऱ्या महसूल प्रशासाची वाळू चोरी यानिमित्ताने उघड पडली. त्यानंतर काहीअंशी रेती उपसा व वाहतूक लपून-छपून सुरू होती मात्र सदर घटनेचा विसर पडताच पुन्हा नव्या जोमाने रेती माफिया वाळूच्या गोरख धंद्यात महसूल व पोलिस प्रशासनाला सोबत घेवून उतरले असून टिप्पर रस्त्यावरून धावतानाचे चित्र आजघडीला दिसून येत आहे.

लोहा शहरातील बुरुड गल्ली येथील जळबा मारोती गुंठे (वय 42) व त्यांची पत्नी मोटारसायकल क्र.एम एच 26, ए 6873 वरून नांदेडकडे जात असताना बसस्थानक वरून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या टिप्पर क्र.एम एच 26 बी ई 4483 ने सदर मोटारसायकलीस ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धडक झाली. त्यात मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले. परंतु सुदैवाने मोटारसायकस्वार गुंठे पती-पत्नी बालंबाल बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी अद्याप पर्यंत लोहा पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

Leave A Reply

Your email address will not be published.