लोह्यात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपीस अटक

1,226

लोहा, नांदेड-

तालुक्यातील देऊळगाव येथील अल्पवयीन सात वर्षीय मागासवर्गीय मुलीवर गावातीलच 35 वर्षीय नराधम तरुणाकडून बळजबरीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार देऊळगाव येथे 29 मे रोजी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान घडला. या प्रकरणी माळाकोळी पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपीस तात्काळ अटक करण्यात आले. घटनास्थाळास कंधारचे उपविभागीय पोलिस अधिकारी थोरात यांनी भेट दिली.

देऊळगाव ता.लोहा येथील सोनवणे या मागासवर्गीय कुटुंबातील दोघे पुरुष मंडळी मंदिर शिल्पकार कामावर मजूर म्हणून बाहेरगावी कामावर आहेत तर घरी केवळ महिला व त्यांची चिमुकले मुले आहेत.दि.29 रोजी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची गावातील रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली होती.अल्पवयीन सात वर्षीय पिडीत मुलीचे घर गावातील मुख्य रस्त्याच्या लगत आहे.

बसवेश्वर महाराज जयंती मिरवणूक पिडीतेच्या घरासमोर रात्री सात ते आठ वाजताच्या सुमारास आली असता मिरवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या टाटा मॅजिक गाडीचा चालक व मालक असलेला आरोपी अमृत व्यंकटी सोनवळे (वय 35) रा.देऊळगाव याने त्याच्या मालकी असलेल्या वाहनात बसलेल्या तीन अल्पवयीन मुलींपैकी एका सात वर्षीय मागासवर्गीय अल्पवयीन मुलीला वाईट हेतूने तिच्या शरीराच्या काही भागावर हात फिरवत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा किळसवाणा प्रयत्न केला. त्यादरम्यान मिरवणुकीत लावलेल्या कर्णकर्कश व मोठ्या आवाजातील डीजेच्या आवाजात त्या अल्पवयीन मुलीचा आवाज कुणालाही ऐकायला येत नव्हता. तसेच मिरवणुकीतील सहभागी मंडळी जयंती सोहळ्यात तल्लीन झाले होते आणि आरोपीने नेमका याच बाबीचा फायदा उठवत सदरील दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला.

सदर अल्पवयीन पिडीता मिरवणूक आटोपल्यानंतर घरी जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी दि.30 मे रोजी सकाळी अल्पवयीन पिडीता उठल्यावर घाबरलेल्या स्थितीत असल्याचे तिच्या चुलतीच्या निदर्शनास आले. ती अशी का वागते म्हणून तिच्या हाताला स्पर्श करून पाहिले असता तिला ताप आला होता.चुलतीने तिची प्रेमाने विचारपूस केली असता तिने रात्री घडलेला प्रकार सांगितला तेंव्हा पिडीतेची आई माहेरी तर वडील कामासाठी बाहेरगावी असल्याने त्या मुलीच्या चुलतीने सदर प्रकार तिचे वडील आणि चुलत्याच्या कानावर घातला. सोनवणे कुटुंबातील दोघेही भाऊ घटनेची माहिती मिळताच गावी येवून सदरील घटने प्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पिडीतेच्या चुलत्याच्या तक्रारीवरून आरोपी अमृत व्यंकटी सोनवळे याच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती ॲक्ट तसेच विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस अवघ्या दोन तासाच्या आत मस्की शिवारातील एका आख्याड्यावरून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती माळाकोळी पोलिसांकडून देण्यात आली. तसेच या  प्रकरणी पिडीतेचा जबाब नोंदवून घेतला आहे. सदर घटने प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात, माळाकोळीचे स.पो.नि.माणिकराव डोके यांनी 31 मे रोजी सकाळी देऊळगाव येथे भेट दिली. आरोपी हा लिंगपिसाट असून यापूर्वी देखील त्याने असे अनेक घाणेरडे प्रकार केले असल्याची चर्चा गावकऱ्यातून सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.