माळाकोळी नजीक राष्ट्रीय महामार्गावर ट्रक अपघातात दोन जखमी

263

लोहा, नांदेड –

नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील माळाकोळी नजीक लांडगेवाडी जवळ रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रक वर दुसरा भरधाव वेगातील आयचर ट्रक जोरदार आदळला. दोन्ही ट्रकच्या मधोमध ट्रकच्या कॅबिन मध्ये ट्रकचालक अडकला होता मात्र नागरिकांच्या सतर्कतेने ट्रकचालक बचावला. सदर घटना दि.10 रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास घडली.

नांदेड – लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्ता एकेरी सुरू आहे त्यामुळे अपघात देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील माळाकोळी पासून तीन किमी अंतरावरील लांडगेवाडी नजीक एका पेट्रोल पांपासमोर दि.10 रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास नांदेडकडे जाणारा सिमेंट वाहतूक करणारा ट्रक क्र.आर जे 03 जी ए 5631 हा रस्त्यालगत उभा होता. दरम्यान लातूर कडून नांदेडकडेच जाणारा भरधाव वेगातील आयचार ट्रक क्र. एम एच 19 झेड 5443 हा तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकवर जोरदार आदळून उलटला. त्यात आयचर चालक अनिल हिरालाल गावंड (वय 22) व विजय भुरीया (वय 32) दोघेही रा. इंदोर (मध्यप्रदेश) गंभीर जखमी झाले. त्यातील चालक अनिल गावंड हा दोन्ही ट्रक मध्ये अडकला होता. उपस्थित नागरिकांनी समयसूचकता दाखवून जेसीबीच्या साह्याने दोन्ही ट्रक बाजूला करून आत अडकलेल्या चालक अनिल यास बाहेर काढले मात्र त्याच्या एका हाताच्या रक्तवाहिन्या तुटल्यामुळे त्यास 108 रुग्णवाहिकेने तात्काळ नांदेडला हलविण्यात आले.

मदत कार्यात लोहा ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णवाहिका चालक सिध्दार्थ ससाणे, माळाकोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे चालक अतिश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर मुरकुटे आदींनी सहभाग घेतला. अपघात स्थळास माळाकोळीचे सपोनी माणिक डोके, पोउपनि संतोष गीते, पोहेकॉ भगवान राठोड, पो कॉ विनोद भुरे आदींनी भेट देवून घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.