बिल्डर संजय बियाणी हत्याकांड प्रकरणी आणखी दोघांना अटक, मध्यप्रदेश राज्यातील उज्जैनमधून नांदेड पोलिसांनी केली अटक; एकूण आरोपींची संख्या झाली 11
नांदेड-
शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी दिल्लीच्या कारागृहात असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील उज्जैनच्या दोघांना नांदेड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते.आज दि.11 जून रोजी त्यांना रितसर प्रक्रिया पार पाडून अटक करण्यात आली आहे. या दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीश एम.आर. सोवानी यांनी 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील पूर्वी अटक करण्यात आलेले 9 आरोपी आणि हे 2 आरोपी असे मिळून आता या प्रकरणात आरोपींची एकूण संख्या 11 झाली आहे.
शहरात दि.5 एप्रिल रोजी शारदानगर भागात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर दोन हल्लेखोरांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्या झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला व तब्बल 55 दिवसाच्या तपासानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पुढे तपासाची एक एक कडी जोडत आतापर्यंत तब्बल आरोपींची संख्या 11 वर पोहोचली आहे.
एसआयटी पथकाचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व तपास पथकातील इतर अधिकारी व कर्मचारी यांनी पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणात आणखी महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होणार आहे.
दरम्यान, या गुन्ह्यात वापरलेली व आरोपींनी जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेली पल्सर कंपनीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली. यापूर्वी पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली असून ते सध्या 13 जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. याच प्रकरणाशी संबंधित असलेले व सध्या दिल्ली कारागृहात एका गंभीर गुन्ह्यात स्थानबद्ध असलेले मध्यप्रदेश उज्जैन येथील राजपालसिंग ईश्वरसिंग चंद्रावत, वय 29 आणि योगेश कैलासचंद भाटी या दोघांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नांदेड पोलिसांनी दोन दिवसापूर्वी ताब्यात घेतले होते. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांना नांदेडला आणण्यात आले. दीपक (पूर्ण नाव माहीत नाही) नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या करणार असल्याचे त्यांच्याकडून पोलीस तपासात निष्पन्न होत आहे. हे दोघेजण यापूर्वी नांदेडला येऊन गेल्याचेही त्यांनी पोलीस तपासात उघड केले आहे.
तपासनिक अंमलदार पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके, सचिन सोनवणे व जलद प्रतिसाद पथकाच्या जवानांनी चोख बंदोबस्तात या दोघांना न्यायालयासमोर हजर केले. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड.जी.एस.वाघमारे यांनी हे दोन्ही आरोपी नांदेडमध्ये कुठे कुठे थांबले होते, कोणाच्या संपर्कात होते, शहरात कुठल्या वाहनाचा वापर केला ? त्यांच्याकडून पिस्टल जप्त करणे बाकी आहे असा युक्तिवाद न्यायालयासमोर केला असता न्यायालयाने या गंभीर प्रकरणाची दखल घेत व आरोपींची पार्श्वभूमी लक्षात घेता 15 जूनपर्यंत राजपालसिंग चंद्रावत आणि योगेश भाटी या दोघांना पोलीस कोठडीत पाठवले आहे. तर यापूर्वी पकडण्यात आलेल्या 9 आरोपींना 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.