रस्त्यावर असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला धडकून वारंगा-हदगाव रस्त्यावर दोन दुचाकीस्वार ठार; नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून निघाले असता घडला दुर्दैवी अपघात

1,431

नांदेड –

जवळच्या नात्यातील एकाचा अंत्यविधी आटोपून गावाकडे परत येणाऱ्या दोन युवकांवर वारंगा फाटा ते हदगाव दरम्यान शिबदरा पाटीजवळ काळाने झडप घातली. रस्त्यावर असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला दुचाकी धडकून दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दि. 25 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वारंगा येथून हदगावकडे जात असताना ता.हदगाव, जि. नांदेड, येथील शिबदरा पाटीजवळ एका मातीच्या ढिगाऱ्याला दुचाकी धडकून घडलेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तालुका कळमनुरीतील चिखली येथील नातेवाईकामधील एकाचा अंत्यविधी उरकून दि.25 मार्च शुक्रवारी रात्री सात वाजता वारंगा येथून हदगावकडे दुचाकीवरून एमएच 26 बीयु 7970, सटवाराव सुर्यवंशी, वय 48 व माधवराव बोंढारे, वय 50, हे दोघेही राहणार हरडफ, ता. हदगाव येथे परत येत होते.

नेमक्या त्याचवेळी शिबदरा पाटीजवळ रस्त्यावर असलेल्या ढिगाऱ्याजवळ दिशादर्शक फलक नसल्याने दुचाकी ढिगाऱ्यावर आदळून पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मनाठा पोलिस ठाण्याचे बीट हवालदार गिरी, कर्मचारी वाघमारे व त्यांचे सहकारी दाखल झाले. सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण व चिट्टेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती बीट हवालदार गिरी यांनी दिली. या घटने प्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.