ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन; पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

373

पुणे –

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तसेच ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले याचं अल्पशा आजारानं निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

एक वर्षापूर्वी डॉ.कोत्तापल्ले यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. तेंव्हापासून ते पिंपरी चिंचवडच्या राहत्या घरी सून आणि मुलगा त्यांच्या प्रकतीवर लक्ष ठेवून होते. परंतु, गेल्या १५ दिवसांपूर्वी त्यांची प्रकती बिघडल्याने त्यांना तात्काळ पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची प्रकती चिंताजनक बनली होती.

साठोत्तरी कालखंडात कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत दर्जेदार वाङ्मयनिर्मिती करणारे नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी मुखेड (जि. नांदेड) या गावी झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देगलूर येथे झाले. बी.ए.आणि एम.ए.या दोन्ही परीक्षांत मराठवाडा विद्यापीठात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. ते कुलपतींच्या सुवर्णपदकाने सन्मानित झाले होते. ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध लिहून त्यांनी १९८० साली पीएच.डी. पदवी संपादन केली. बीड येथील महाविद्यालयात १९७१ ते १९७७ या काळात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून काम केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांनी अधिव्याख्याता आणि प्रपाठक या पदांवर १९७७ ते १९९६ या काळात काम केले.

१९९६ ते २००५ या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम केले. २००५ सालापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. व्यासंगी, अध्यापनकुशल, उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आणि पुणे विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक या पदांवरून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य अकादमी या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष (१९८८-१९८९), महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विविध विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.श्रीगोंदा येथे १९९९ साली झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि २००५ साली जालना येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. चिपळूण येथे २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते.

डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना मिळालेले पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न.चिं.केळकर साहित्य पुरस्कार

महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार

मूड्स (१९७६)

संदर्भ (१९८४)

गांधारीचे डोळे (१९८५)

ग्रामीण साहित्य (१९८५)

‘ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध’साठी परिमल पुरस्कार (१९८५)

यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (२००१) ‘राख आणि पाऊस’साठी बी. रघुनाथ पुरस्कार (१९९५) ‘राख आणि पाऊस’साठी महात्मा फुले पुरस्कार (१९९५)

उद्याच्या सुंदर दिवसासाठी (२००२)

‘ज्योतिपर्व साठी केशवराव विचारे पारितोषिक (२००२)

दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पदाश्री डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार (२०१८)

‘साहित्य अवकाश’साठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.