लोहा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीसाठी आज होणार मतदान.. ३४ हजार ३३८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

127

लोहा, नांदेड –

लोहा तालुक्यातील मुदत संपलेल्या 28 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत असून आज दि.१८ रोजी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सदर होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकी पैकी यापूर्वीच सहा ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत‌. त्यामध्ये मंगरूळ, मडकी, भेंडेगाव, वाळके वाडी व अन्य एक अशा सहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर आज २२ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. सरपंच पदासाठी पुन्हा एकदा थेट जनतेतून निवड करण्यात येत असल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. सदरील एकूण २२ ग्रामपंचायतीसाठी एकूण ३४ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

लोहा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची होत असल्याने व थेट जनतेतून सरपंच पदाची निवड असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. शेवटच्या दिवसाअखेर शनिवारी रात्री उशिरा पर्यंत इच्छुक गाव कारभारऱ्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभने, आश्वासन तसेच ओल्या पार्ट्या सोबत लक्ष्मी दर्शन होत असल्याचे दिसून येत असून महिलांना साड्या वाटपही झाल्याचे ठिकठिकाणाहून समजते. काही गावामध्ये दोन गट आमनेसामने येवून शाब्दिक चकमक होत आहे. सध्याच्या टप्प्यातील सोनखेड ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. त्यामुळे सदर ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात यावी यासाठी या भागातील काँग्रेसचे आ.हंबर्डे प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे खा.चिखलीकर यांचा गट सुद्धा तेवढ्याच जोमात कामाला लागला आहे.

तालुक्यातील २८ पैकी २२ ग्रामपंचायतीसाठी च्या सरपंच पदासाठी १०२ उमेदवार तर ७० प्रभागासाठी च्या सदस्य पदासाठी जवळपास २८० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण ३४ हजार ३३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये १६ हजार ४६२ महिला मतदार तर १७ हजार ८७६ पुरुष मतदारांचा समावेश आहे. मतदान प्रक्रियेसाठी २८० कर्मचारी व २५ राखीव कर्मचारी तर ११ झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. सदरील निवडणुकीसाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये १ पोलिस निरीक्षक, १३ सपोनि व पोउपनि, ११७ पोलिस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे १३१ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

निवडणुकीच्या यशस्वीतेसाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रमुख तथा नायब तहसीलदार राम बोरगावकर, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संजय भोसीकर, निवडणूक नियुक्ती नायब तहसीलदार संजय शिखरे, नायब तहसीलदार अशोक मोकले, अव्वल कारकून प्रमोद बडवणे, महसूलचे गोविंद पटने, सूर्यकांत पांचाळ, मळगे आदी परिश्रम घेत आहेत.

सरपंच पद हे थेट जनतेतून निवडून द्यायचे असल्याने ग्रामीण भागातील निरक्षर महिला- पुरुष मतदारांचा देखील मोठा कस लागणार आहे. विविध पक्षाच्या नेत्यांनी या ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहाव्या यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांच्या मद्यामातून प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली आहे. आज झालेल्या मतदानाचा निकाल दि. २० तारखेला मंगळवारी घोषित करण्यात येणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष २० रोजी होणाऱ्या निकालाकडे लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.