अखेर युद्ध सुरू ! रशियन सैन्याची युक्रेनमद्धे धडक; अनेक शहरात स्फोट
मॉस्को, रशिया –
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अखेर युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. त्यांनी युक्रेनच्या सैन्याला शरण या असा इशारा दिला आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी आज गुरुवारी पहाटे संबोधित करताना म्हटले आहे की, रशिया पूर्व युक्रेनमध्ये विशेष लष्करी ऑपरेशन करेल. याबाबतचे वृत्त एपी आणि बीबीसीने दिले आहे.
रशियाने डोन्बास प्रांतात लष्करी कारवाई सुरू केल्यामुळे अखेर युद्ध सुरू झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे. पुतीन यांनी इतर देशांना इशारा देताना म्हणाले की, रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची काही खैर नाही. दरम्यान युक्रेनची राजधानी ‘कीव’मध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला शरणागती पत्करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर या युद्धात हस्तक्षेप करणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असाही इशारा पुतीन यांनी इतर देशांना दिला आहे.
पुतीन यांनी आज गुरुवारी सकाळी युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली. याचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारात उमटले. शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 2 हजार अंकांनी कोसळला. तर निफ्टी 600 अंकांनी खाली आला आहे.