दिव्यांगांच्या विविध योजना प्रभावी राबवून पथदर्शक मॉडेल निर्माण करू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

333

नांदेड –

दिव्यांगांचे अनेक प्रश्न आहेत. त्याचा शासकीय योजनानुसार प्राधान्यक्रम निश्चित करून प्रभावी अंमलबजावणीद्वारे पथदर्शक मॉडेल निर्माण करू असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दिव्यांगाकरीता न्यायालयीन तरतुदी, दिव्यांग निर्मूलनासाठी शीघ्र निदान व उपचार या विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजितकौर जज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सतेंद्र वी.आऊलवार जिल्हा समाज कल्याण अधिकारी, लॉयन्स क्लबचे प्रेमकुमार फेरवाणी, डॉ.लक्ष्मीकांत बजाज व डॉ.अर्चना बजाज, देवसरकर आदींची उपस्थिती होती.

शारीरिक आव्हानावर मात करून त्याची भर अन्य कलेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीने भरून काढलेली असते.यांच्यातील कलागुणांना चालना दिल्यास आणखी उत्तम कार्य ते करू शकतात.खेळातही जिल्हा-राज्य नव्हे तर राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर ते उत्तम यश मिळवू शकतात असा विश्वास जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी बोलताना जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर म्हणाल्या की, देशात प्रथमच महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आगामी काळात अधिकाधिक दिव्यांगांनाच्या विविध योजना गतीने मदत मिळू शकेल. समाजकल्याण विभागाने दिव्यांगांच्या कौशल्य विकासासाठी प्रयत्न केल्यास दिव्यांग अधिक स्वावलंबी होतील. जिल्ह्यांतील शेवटच्या दिव्यांग व्यक्तीस शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी शिबीर, मेळाव्याचे आयोजन करावे अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजितकौर जज यांनी दिव्यांगांकरीता न्यायालयीन तरतुदी तर डॉ.लक्ष्मीकांत बजाज यांनी दिव्यांग निर्मूलनासाठी शीघ्र निदान व उपचार या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.यावेळी लॉयन्स क्लबचे प्रेमकुमार फेरवाणी, डॉ.अर्चना बजाज यांनीही विचार मांडले. जि.प.च्या माजी सदस्या सौ.पूनम पवार उपस्थित होत्या. . प्रास्ताविकात जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार यांनी दिव्यांगांना सहानुभूतीची नाही तर संधीची गरज असल्याचे सांगितले. दिव्यांगांबाबत जनजागृती, शिक्षण, पुनर्वसन यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे स्पष्ट केले.

सूत्रसंचलनात मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी दिव्यांग दिनाचा इतिहास, शासन तसेच स्वयंसेवी संस्था माध्यमांतून होणारे काम याची उपस्थितांना माहिती दिली. या कार्यक्रमास जिल्ह्यातील दिव्यांग शाळेच्या शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.वसरणी अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुरेख स्वागत गीत गात उपस्थितांचे लक्ष वेधले.

Leave A Reply

Your email address will not be published.