नांदेडच्या दत्तनगर भागातील ‘फायनान्स’ चालकाकडे आढळला शस्त्रसाठा; 8 तलवारीसह खंजर व गुप्ती केले जप्त

शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाची कारवाई

1,613

नांदेड –

नांदेड शहरातील दत्तनगर भागातील एका फायनान्स चालकाकडे शस्त्रसाठा आढळून आला आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून 8 तलवारी, 1 खंजर, 1 गुप्ती जप्त केले आहे. नांदेडच्या शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे. हा शस्त्रसाठा नेमका कशासाठी करण्यात आला होता याचा पोलीस तपास करत आहे.

सध्या जिल्ह्यात अवैध शस्त्र वापरून गुन्हे करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, अप्पर पोलीस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी वेळोवेळी बैठका घेवून अवैध हत्यार बाळगणारे व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते.

दि.8 मे रोजी दत्तनगर भागातील एका फायनान्स कार्यालयात बेकायदेशीर शस्त्र लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलीसांनी तेथे छापा टाकून दहा धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांना प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, विश्वदिप रोडे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, देवसिंग सिंगल, दिलीप राठोड, रामकिशन मोरे, दशरथ पाटील व दत्ता वडजे यांनी शहरातील दत्तनगर भागातील दशमेश फायनान्स कार्यालयात जावून छापा मारला.

त्या ठिकाणी पोलीसांना सुनिल सिंग भगतसिंग आडे, वय 23 रा.चिखलवाडी कॉर्नर, नांदेड हा आढळून आला. यावेळी कार्यालयाची पंचासमक्ष झडती घेतली असता जवळ अवैधपणे बाळगलेले 8 तलवारी, 1 खंजर व 1 गुप्ती असे एकुण 10 धारधार शस्त्रे (अंदाजित किंमत 35 हजार रुपये ) आढळून आले. त्या ठिकाणी सुनिलसिंग भगतसिंग आडे या व्यक्तीला पकडण्यात आले असून त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्यानुसार शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.