‘लाडक्या बाप्पा’ च्या विसर्जनासाठी गेला अन् जीव गमावून बसला; नायगाव तालुक्यातील भोपाळा येथील तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

1,486

नांदेड –

नायगाव तालुक्यातील भोपाळा येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तरुण युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.9 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली आहे.

मौजे भोपाळा येथील एका तलावात श्रीगणेशाचे विसर्जन करण्यासाठी गणेश मंडळाचे अधिकारी व पदाधिकारी गेले होते. श्रीगणेशाचे तळ्यात विसर्जन केल्यानंतर सर्व कार्यकर्ते घराकडे जात असताना काही मुले सदरच्या तळ्यात पोहण्यासाठी उतरले होते, याचवेळी 22 वर्षीय तरुण राजेश बाबुराव हत्तीनगरे हा सुद्धा तळ्यात पोहण्यासाठी गेला असता तलावातील गाळात अडकून त्याचा बुडून मृत्यू झाला.

दरवर्षी प्रमाणे यंदाही भोपाळा येथे बसवण्यात आलेल्या सार्वजनिक युवा गणेश मंडळ गणपतीचे विसर्जन करण्यासाठी दि.9 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या पाझर तलावात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पाण्यात उतरलेल्या शिवकुमार बाबुराव हत्तीनगरे, वय 20 या तरुण युवकाचा पाझर तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यातील गाळात फसून तो पाण्यात अडकला. हे पाहून गणपती विसर्जनासाठी गेलेल्या इतर तरुण युवकांची एकच धांदल उडाली होती.

गणेश मुर्ती सोडण्यासाठी गेलेला तरुण युवक पाण्यात फसला या घटनेची माहिती माजी सरपंच आनंदराव पाटील बावणे यांनी रामतीर्थ पोलीस व तहसील प्रशासनाला कळविली असता रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनि संकेत दिघे यांच्यासह पोलीस कर्मचारी व नायगाव तहसीलचे तहसीलदार गजानन शिंदे, तलाठी विजय पाटील यासह गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पाण्यात फसलेल्या युवकाला पाण्याबाहेर काढण्यासाठी तब्बल दीड तास प्रयत्न केले. परंतु, अनेकांना तो हाताला लागत नसल्याने हनमंत हत्तीनगरे, बाबुराव हत्तीनगरे, व्यंकट हत्तीनगरे, आनंदा मष्णाजी कोठेवाड यांनी गळाच्या साह्याने पाण्यात अडकलेल्या तरुणाला बाहेर काढले. परंतु, तब्बल दीड तास पाण्यात अडकल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सदरील घटनेचा रामतीर्थ पोलिसांनी रितसर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आले. या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे भोपाळा व शंकरनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, शिवकुमार हत्तीनगरे हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. तो शंकरनगर येथील गोदावरी मनार कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे आई वडिलांचा आधार गेला असून त्याच्या वयोवृद्ध आई-वडिलास शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.