सहा हजार रुपयांची लाच घेताना दोघे अडकले ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
सहा हजार रुपयांची लाच घेताना दोघे अडकले 'लाचलुचपत'च्या जाळ्यात
नांदेड –
कालबद्ध पदोन्नतीच्या फरकाच्या रकमेचे बिल मंजूर करून देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मुखेडच्या सहायक लेखाधिकारी आणि आरोग्य सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले आहे. मंगळवारी दि.29 मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार यांच्या कालबद्ध पदोन्नती फरकाच्या रकमेचे बिल मंजुरीसाठी मुखेड पंचायत समितीकडे पाठविण्यात आले होते. हे बिल मंजूर करण्यासाठी सहायक लेखाधिकारी गजानन पेंढकर यांनी आरोग्य सहायक शेख शादुल हबीब साब याच्या मध्यस्थीने तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती.तक्रारदाराने आपल्या कामासाठी अनेक वेळा खेटे मारले होते परंतु लाच दिल्याशिवाय काम होणार नाही असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तडजोडीअंती 6 हजार रुपये घेण्याचे ठरले. लाच प्रतिबंधक पथकाने दि.29 मार्च रोजी लाच मागणीची पडताळणी केली. त्यानंतर सापळा रचला. यावेळी शेख शादुल यास तक्रारदाराकडून 6 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हि कार्यवाही डॉ.राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद परिक्षेत्र औरंगाबाद अतिरिक्त पदभार नांदेड, धरमसिंग चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि, नांदेड परिक्षेत्र नांदेड, राजेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक लाप्रवि, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी प्रकाश वांद्रे पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि नांदेड, सहा.सापळा अधिकारी, शेषराव नितनवरे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, नांदेड यांच्या नेतृत्वाखाली सापळा पथक पोहेकॉ हणमंत बोरकर, पोना एकनाथ गंगातिर्थ, प्रकाश श्रीरामे चापोना नीलकंठ यमुनवाड लाप्रवि नांदेड यांनी यशस्वी केली.