पदयात्रेसाठी आलेल्या मायलेकीचा पांडवलेणी तलावात बुडून करुण अंत ! माहूर येथील दुर्दैवी घटना; आंघोळ करताना पाय घसरला
माहूर, नांदेड –
बुलढाणा जिल्ह्यातून पायी दिंडीत आलेल्या मायलेकीचा पांडवलेणी तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना दि.10 शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. नागरिकांनी पोलिसांना सूचना दिल्यानंतर मायलेकीचे मृतदेह तलावाच्या बाहेर काढण्यात आले.आंघोळ करताना पाय घसरल्याने ही घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र चारठाणा येथील दिंडी प्रमुख दिनकर शामराव देशपांडे तसेच महिला संपर्कप्रमुख दुर्गा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.3 रोजी दहा ते बारा गावाच्या 70 ते 80 नागरिकांना घेऊन दिंडी माहूरकडे निघाली होती. दिंडी माहूरला पोहोचल्यानंतर दि. 10 रोजी समर्थ सेवा अन्नछत्र येथे महाप्रसाद घेऊन दिंडी परत 3 वाजता निघणार होती. सदरील महिला व तिची मुलगी वाहन चालकांना आंघोळीसाठी जात असल्याचे सांगून भक्तमंडळ येथून निघाले. मात्र, बराच वेळ होऊन परतले नसल्याने दिंडीतील वारकऱ्यांनी त्यांची शोधाशोध केली दोन्ही महिला न मिळाल्याने दिंडी प्रमुख देशपांडे यांनी माहूरच्या पोलीस ठाण्यात महिला हरवल्याची माहिती दिली.काही वेळानंतर पांडवलेणी तलावाच्या काठावरून शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना एका महिलेचा मृतदेह तलावात तरंगत असल्याची माहिती पोलिसांना दूरध्वनीवरून दिली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत पोहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने मृतदेह तलावाच्या बाहेर काढण्यात आले. महिलांच्या साहित्याची तपासणी केली असता त्यामध्ये महिलेचे मतदान कार्ड आढळून आले. यावरून महिलेचे नाव फुलाबाई चीनकीराम मोरे, वय 65 वर्ष रा. धानोरा ता.जिंतूर जि.परभणी असे कळाले. मात्र त्याचवेळी नागरिकांनी तिची मुलगीसोबत होती असे सांगितल्याने तलावात पुन्हा शोध घेण्यात आला. तेंव्हा दुसरा मृतदेह आढळून आला. तिचे नाव नर्मदा प्रकाश पजई राहणार सायखेडा ता.जिंतूर जि.परभणी असे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक नामदेव रिठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्रीधर जगताप, पोहेकाँ विजय आडे, गोपनवाड, पोकाँ आनंद राठोड, हे करीत आहेत.