कोण होईल माहूरचा नवा नगराध्यक्ष, उत्सुकता शिगेला; माहुरात सत्तापेच कायम!

रा.काँ, काँग्रेसचे नगरसेवक स्वतंत्रपणे सहलीवर, शिवसेना नगरसेवक खुले !

190
जयकुमार अडकीने,
माहूर, नांदेड –

नुकतीच माहूर नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्वीच्या संख्याबळात उणे एक म्हणजे सात काँग्रेसला तीन अधिक म्हणजे सहा, शिवसेनेला एक वजा म्हणजे तीन तर भाजपाला पूर्वीप्रमाणेच एक असे संख्याबळ प्राप्त झाले असून माहूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षात चढाओढ सुरु झाली आहे. राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला नगराध्यक्षपद खेचून घेण्यासाठी शिवसेनेच्या तीन सदस्याची मदत घ्यावी लागणार हे निर्विवाद सत्य आहे.

दि. २७ रोजी झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये माहूरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुला सुटले असून दोन्ही काँग्रेसकडे काँग्रेसतर्फे प्राचार्य राजेंद्र केशवे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे इतर पराभूत झाले असल्याने एकमेव फिरोज दोसानी तर हे दोन चेहरे नगराध्यक्ष पदाचे दावेदार असून दोन्ही काँग्रेसकडून शिवसेनेला आपल्या बाजूने वळविण्याकरीता निकराचे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेनेतर्फेही सावध पवित्रा घेतला जात असून दोन्ही काँग्रेसच्या मनधरणीत अद्याप आपला पत्ता खुला केला नसल्याने सस्पेन्स वाढला आहे. शिवसेना ३ व भाजपा एकमेव सदस्य असा चार सदस्याचा गट एकत्र येऊन नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगत आणणार असल्याचीही चर्चा होत आहे.

आगामी वाई बा.ग्रा.प.ची निवडणूक व जि.प.,प.स. निवडणुका, जिल्हा नियोजन मंडळ सदस्यत्वच्या निमित्ताने पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्याशी असलेली जवळीक लक्षात घेता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा काँग्रेसच्या पारड्यात आपले वजन टाकेल अशी राजकीय विश्लेषकांची धारणा असून महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीचा विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस मध्ये फारसा संख्याबळाचा फरक नसल्याने माहूर शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून पालकमंत्री अशोकराव चव्हाणांना पहिला मान म्हणून पहिले अडीच वर्ष काँग्रेस, पुढील अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष तर पाचही वर्ष शिवसेनेचा उपाध्यक्ष या फार्मुल्यावर महाविकास आघाडीची सत्ता माहूर न.प. वर येईल असाही एक मतप्रवाह आहे.

तर राज्यात महाविकास आघाडीच्या रूपाने सत्तेत जरी असले तरी माहूर शहरासह तालुक्यात वेगळी परिस्थिती असून राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेना या पक्षात आजतागायत कधीही समन्वय दिसत नसल्याने यावर तूर्तास प्रश्नचिन्ह आहे. माहूर तालुका व शहरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे विळा भोपळ्याचे सख्य असून दोन्ही काँग्रेस शिवसेनेचा पाठिंबा आपल्याला मिळावा या प्रयत्नात असून माहूर न.प. वर शिवसेनेच्या सहकार्याने सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माहूर शहराच्या सत्ताकारणात शिवसेनेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. शिवसेना ज्या काँग्रेसच्या पारड्यात आपले वजन टाकेल त्याचे पारडे जड होऊन निर्विवाद सत्ता स्थापन करेल याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. असे असले तरी माहूर नगरपंचायतमध्ये उदभवलेल्या सत्तापेचात पालकमंत्री अशोकराव चव्हाण, खा.हेमंत पाटील, माजी आमदार प्रदीप नाईक हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते काय तोडगा काढतात आणि माहूर नगरपंचायतचा सत्तापेच कसा सोडवितात? याकडे माहूरवासियांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.