अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार की बिनविरोध होणार ? राजकीय मंडळींसह जनतेचे लागले लक्ष

604

सखाराम क्षीरसागर,

अर्धापूर, नांदेड –

अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक दि.१४ फेब्रुवारी रोजी या दोन्ही पदाची निवड केली जाणार आहे. मात्र येथील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदी कोणाची निवड होणार याकडे राजकीय मंडळीसह जनतेचे लक्ष लागले आहे.

नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार असून त्याची छाननी त्याच दिवशी दुपारी २.०० नंतर होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेणे दि.१० फेब्रुवारी दुपारी ४.०० वाजेपर्यंत आणि दि.१४ फेब्रुवारी सकाळी ११.०० दुपारी ४.०० वाजेपर्यंत विशेष सभेत नगराध्यक्षपदाची निवड जाहीर करण्यात येणार आहे. तर उपनगराध्यक्ष पदासाठी दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १.०० ते ३.०० वाजेपर्यंत उमेदवारी दाखल केली जाणार असून दुपारी ३.०० ते ३.३० वाजता छाननी आणि ३.३० ते ३.४५ वाजेपर्यंत उमेदवारी माघार घेण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेनंतर त्याच दिवशी दुपारी ३.४५ नंतर उपनगराध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी लेखी पत्रकाद्वारे दिली आहे.

अर्धापूर नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेस पक्षाला एकूण १७ जागेपैकी १० जागा तर एकमेव अपक्ष नगरसेवकाने काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे संख्याबळ ११ वर गेले असून एमआयएम – ३, भाजपा – २, राष्ट्रवादी – १ असे पक्षीय बलाबल आहे. नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारणसाठी सुटले असल्याने नगराध्यक्ष पद कोणाला मिळेल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. तर अनेक नगरसेवकांना नगराध्यक्ष पद मिळावे याकरीता पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे नेते मंडळीकडून जोरदारपणे यंत्रणा राबवून पद मिळावे यासाठी नगरसेवक व्यस्त असल्याची चर्चा अर्धापूरातील जनतेत सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे नगराध्यक्ष पदासाठी कोणाला संधी देतील? याकडे अर्धापूरकरांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.