नांदेडमध्ये वाईन शॉप व्यवस्थापकाचा भोसकून खून; सिडको परिसरातील घटना
नांदेड –
नांदेडच्या सिडको परिसरातील ढवळे कॉर्नर येथील प्रदीप वाईन शॉपच्या व्यवस्थापकाचा अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना दि.1 सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वाईन शॉप व्यवस्थापक माधव वाकोरे
नांदेडच्या सिडको परिसरातील ढवळे कॉर्नर येथे संदीप सुभाषराव चिखलीकर यांच्या मालकीचे प्रदीप वाईन शॉप आहे. या दुकानात माधव जीवनराव वाकोरे काटकळंबेकर, वय 32, हे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. 1 सप्टेंबर रोजी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान व्यवस्थापक माधव वाकोरे यांचा काही तरुणांसोबत वाद झाला.त्यानंतर काही वेळाने काही तरुण तेथे आले. यावेळी माधव वाकोरे व या तरुणांमध्ये झटापट झाली. दरम्यान,अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने माधव वाकोरे यांच्या पोटावर वार करून त्यांना गंभीररित्या जखमी केले. जखमी अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच माधव वाकोरे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत टासले, उपनिरीक्षक अनिल बिच्चेवार यांनी घटनास्थळी भेट दिली.
आरोपींच्या शोधासाठी रात्री उशिरापर्यंत वेगवेगळे पथके रवाना करण्यात आले होते. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सिडको परिसरात ही थरारक घटना घडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.