“होय.. तेंव्हा मी मोहम्मद अली रोडवर 13 वा स्फोट झाल्याचे म्हणालो”! शरद पवारांनी सांगितले नेमके कारण

384

NEWS HOUR मराठी डेस्क

जळगाव-

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 14 ट्विट करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत मुंबईत 12 स्फोट झाले, तेंव्हा शरद पवारांनी मुस्लीम भागातील मोहम्मद अली रोडवर 13 वा स्फोट शोधून काढला होता. कायदा आणि सुव्यवस्थेऐवजी लांगुलचालन करण्याला त्यांचे प्राधान्य होते असे टीकास्त्रही त्यांनी सोडले होते. देवेंद्र फडणवीसांच्या या आरोपांना शरद पवार यांनी जळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तरे दिली आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल तब्बल 14 ट्विट करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.त्यापैकी एका ट्विट मध्ये त्यांनी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांवेळी शरद पवार यांनी अतिरिक्त बॉम्बस्फोटाची चुकीची माहिती दिल्याचा उल्लेख केला होता. मुंबईत 1993 मध्ये 12 बॉम्बस्फोट झाले असतानाही 13 वा स्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे पवार यांनी खोटे सांगितले असेही फडणवीस यांनी ट्विटमध्ये नमुद केले आहे.मुंबईत 12 स्फोट झाले, तेंव्हा शरद पवारांनी मुस्लीम भागात झालेला 13 वा स्फोट शोधून काढला होता. त्यावरून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याऐवजी लांगुलचालन करण्याला त्यांचे प्राधान्य होते अशी टीकाही फडणवीस यांनी केली होती.

फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना पवार यांनी पत्रकार परिषदेत उत्तरे दिली. फडणवीस यांनी दिलेली आकडेवारी खरी आहे.मुंबईत 12 बॉम्बस्फोट झाले असताना,13 ठिकाणी स्फोट झाल्याचे मी तेंव्हा सांगितले होते. त्यात मुस्लीम भागाचे नावही घेतले होते. मुंबईत ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, ती सर्व हिंदुंची ठिकाणे होती.या स्फोटामागे कोण आहेत याचा शोध घेतला, यासाठी जे साहित्य वापरले गेले ते भारतात तयार होत नाही ते कराचीत तयार होते यांची माहिती मिळाली.

त्यामुळे यामागे बाहेरची शक्ती असल्याने शेजारचा देश हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद वाढवायचे काम आणि मुंबईत आग लागावी अशा प्रयत्नात होता.स्फोटाच्या कटात स्थानिक मुस्लीम त्यात नव्हते.मात्र मी 13 वे ठिकाण मोहम्मद अली रोड सांगितल्यामुळे जातीय दंगली करण्याची ज्यांची इच्छा होती, त्या दंगली झाल्या नाहीत असेही पवार यांनी यावेळी सांगितले. यामुळे हिंदू-मुस्लीम एकत्र आले आणि परकीय शक्तीच्या विरुद्ध उभे राहावे असे त्यांचे मत झाले. चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आल्यावर मला त्यांच्याकडून समन्स आले.त्यात “तुम्ही असे का म्हणाला,” अशी विचारणा करण्यात आली?त्यावेळी ऐक्य राहावे म्हणून मी बोललो असे सांगितले.

शरद पवार यांनी त्यावेळी अशी भूमिका घेतली नसती, तर मुंबईत आग लागली असती त्यामुळे त्यांचा हा निर्णय समाजाच्या हिताचा होता असे अहवालात म्हटले असल्याने हे तारतम्य ज्यांना कळत नाही, ज्यांना प्रश्नाचे गांभीर्य कळत नाही, त्यांनी काही विधाने केली असतील, तर त्याची फारशी नोंद घेण्याचे कारण नाही अशा शब्दांत पवार यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.